Ad will apear here
Next
गोष्ट दोन वेणुगोपाळांची


मला कर्नाटकमधल्या होयसळ राजांनी बांधवून घेतलेली मंदिरे फार आवडतात. क्लोरायटिक शिस्ट नावाच्या दगडाच्या शिळांवरून होयसळ राज्यातल्या कुशल शिल्पींची बोटे फिरली आणि त्या दगडाची रेष न् रेष जिवंत झाली. नजर ठरणार नाही इतकी सुंदर शिल्पे, मूर्ती. एका मंदिराचे शिल्पसौंदर्य बघून आपण भारावून जातो न जातो तोच दुसऱ्या मंदिरावर त्याहूनही अधिक सुंदर मूर्ती, अधिक सुबक कोरीव काम, मूर्तीच्या मुखावरचे भाव अजूनच देखणे. होयसळ मंदिरे बघताना देगलूरकर सरांचा शब्द वापरायचा तर आपण एकदम शिल्पबंबाळ होऊन जातो. 

मुळात हा शिस्ट दगड खाणीतून काढल्या काढल्या म्हणे साबणासारखा मऊ असतो. किंबहुना म्हणूनच त्याला सोपस्टोन म्हणतात; पण होयसळ साम्राज्यातल्या गुणी शिल्पींचा दैवी स्पर्श त्याला झाला आणि दगडात लपलेले देवत्व बाहेर आले. आपल्या बोटातली कला हे तो देवाचे देणे हे त्या शिल्पकारांनाही माहिती असावे, म्हणूनच त्यांनी आपली नावे आपल्या हातून घडलेल्या अलौकिक शिल्पांवर कोरून ठेवलेली आहेत. मलोजा, मणीयोजा, दासोजा, मालीतम्मा अशी कितीतरी नावे. त्यांनी दगडाला देवरूप दिले आणि आजही त्यांनी घडवलेल्या मूर्ती भक्तांना अभय देत इथल्या मंदिरात उभ्या आहेत. 

बेलवाडी हे असेच एक मंदिर. होयसळ राजा नरसिंह पहिला याने बांधायला घेतलेले. पुढे हे मंदिर त्याचा मुलगा वीर बल्लाळ पहिला ह्याने बांधवून पूर्ण केले. त्रिकुटाचल पद्धतीचे म्हणजे तीन शिखरे आणि तीन गर्भगृहे असलेले विलक्षण देखणे मंदिर. तिन्ही मंदिरांना जोडणारा, १०८ खांबांवर तोललेला सभामंडप. त्या खांबांचे पॉलिश इतके सुरेख की आजही, अगदी आठशे वर्षांनंतरही तुम्ही तुमचा चेहरा त्या खांबात प्रतिबिंबित झालेला पाहू शकता. 

ह्या मंदिराचे एक मोठे आकर्षण म्हणजे हे मंदिर सुदैवाने अनाघ्रात राहिले. मलिक काफूर ह्या अल्लाउद्दीन खिलजीच्या जुलमी, क्रूर, धर्मांध मूर्तिभंजकाची वक्रदृष्टी ह्या मंदिराकडे वळली नाही. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने बेलवाडीपासून जवळच असलेली होयसळ राज्याची राजधानी द्वारसमुद्रम लुटून, तोडून, मोडून पार बेचिराग करून टाकली, इथली मंदिरे ध्वस्त केली, मूर्ती फोडल्या, इथल्या हिंदू लोकांचा नृशंस नरसंहार केला आणि हजारो हिंदू स्त्रिया आणि मुले ह्यांना गुलाम केले तेव्हा बेलवाडी कदाचित थोडे जंगलात असल्यामुळे असेल, पण ह्या संहारापासून हे गांव वाचले. 
इथल्या वेणुगोपाल, वीरनारायण आणि श्री नरसिंहाच्या मूर्ती आठशे वर्षांपासून अखंड पूजेत आहेत. हे गाव म्हैसूर संस्थानाने श्री शृंगेरी मठाला दान म्हणून दिले होते. तेव्हापासून ह्या मंदिराची व्यवस्था मठातर्फे बघितली जाते. 

मंदिराचे पौरोहित्य सध्या प्रशांत भारद्वाज नावाचा एक हसरा, उमदा, तरुण अर्चक करतो. गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या घराण्यात ह्या मंदिराचे पौरोहित्य करण्याची अखंडित परंपरा आहे. औपचारिक इंग्रजी उच्च शिक्षण घेऊनसुद्धा प्रशांत शहरातली नोकरी, तिथले छानछोकीचे जीवन सोडून आपल्या घराण्याचा पारंपरिक वारसा जपण्यासाठी म्हणून बेलवाडीत परत आला. मंदिराचे पौरोहित्य तो अत्यंत श्रद्धेने, आत्मीयतेने आणि खरोखरच मनापासून सेवा म्हणून करतो, नोकरी म्हणून नाही. 

इथली वेणुगोपाळाची मूर्ती अत्यंत सुरेख आहे. अगदी एएसआयच्या तज्ज्ञ मूर्तिशास्त्रज्ञ लोकांनी तसे मान्य केलेले आहे. काळ्या कुळकुळीत गंडकी पाषाणाच्या एकाच शिळेतून निर्माण केलेली मूर्ती म्हणजे खरोखरच कुणा अत्यंत समर्थ शिल्पकाराच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचे फळ आहे. 

वेणुगोपाळ आपल्याच तंद्रीत मग्न होऊन झाडाखाली मुरली वाजवतोय. त्याच्या कपाळावर सुरेख रेखलेले ऊर्ध्व पुंड्र आहे. त्याचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, हाताची बोटे लांबसडक आणि रेखीव आहेत. एक पाय जमिनीवर पूर्ण टेकलेला आहे, तर दुसऱ्या पायाची फक्त बोटे जमिनीवर टेकलेली आहेत. त्या देखण्या पावलांना बघितलं, की देवाच्या पावलांना चरणकमल का म्हणतात ते पुरतंच उमगतं. श्रीकृष्णाचे शरीर त्रिभंगात आहे. मागे प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या पायाशी दोन्ही बाजूला श्रीदेवी-भूदेवी आहेत. वर सनक, सनन्दन, सनातन व सनत्कुमार हे चार ऋषी मुरली ऐकायला ध्यानस्थ बसले आहेत. ऋषींच्या खाली तल्लीन होऊन श्रीकृष्णाच्या गायी त्याचे मुरलीवादन ऐकत आहेत. सर्व गायींची तोंडे श्रीकृष्णाकडे वळलेली आहेत. 

मुरलीधराच्या अस्फुट कमळकळीसारख्या ओठांवर मंद स्मित आहे. अशी ही अत्यंत देखणी मूर्ती. त्या मूर्तीवर प्रशांत अत्यंत प्रेमाने नित्यअलंकार चढवतो. मोजकीच फुले. मुकुटावर एक टपोरे फूल, मुरलीच्या टोकावर एक, पायांवर दोन, शेजारी श्रीदेवी भूदेवीवर दोन, गळ्यात एक किंवा दोनच टपोरे मोगरीचे हार आणि नीटनेटके नेसवलेले, एकही चुणी नसलेले स्वच्छ पांढरे धोतर. गर्भगृहात भरून राहिलेला तो कापराचा, धूपाचा, आरतीचा, फुलांचा मंद, मिश्र दरवळ आणि खाली एका तबकात ठेवलेली घासून पुसून स्वच्छ केलेली लखलखणारी  चांदीची आणि तांब्या-पितळेची पूजेची उपकरणे. इतकं प्रसन्न वाटतं बेलवाडीच्या मंदिरात गाभाऱ्याबाहेर उभं राहिलं की! वाटतं की कुठल्याही क्षणी तो मुरलीधर आपल्या त्या रेखीव ओठांनी त्या बासरीत हळुवारपणे फुंकर मारेल आणि आपण त्या स्वर्गीय सुरांच्या प्रवाहात वाहून जाऊ आणि आपलं ते सुरात हरवून जाणं प्रसन्न नजरेने तो सावळा पाहत असेल. 



अगदी असाच एक दुसरा वेणुगोपाळ सोमनाथपूरच्या होयसळ मंदिरातही आहे. अशाच काळ्या दगडातून तशाच एका समर्थ शिल्पकाराच्या हातून साकार झालेला. तशीच उंची, तसाच संगीतात हरवून गेलेला सुंदर चेहरा, तसेच पाय, तशीच उभं राहण्याची ढब, तशाच आजूबाजूला ते स्वर्गीय संगीत ऐकायला जमलेल्या गायी. सगळे काही बेलवाडीच्या पूजेतल्या वेणुगोपाळासारखे;. पण ही मुरलीधराची मूर्ती उदास आहे. कधीकाळी मलिक काफूर आणि त्याच्या उद्दाम, धर्मांध, क्रूर, सौंदर्यद्वेष्ट्या सैनिकांचे पांढरे पाय ह्या मंदिराला लागले आणि तेव्हापासून ह्या वेणुगोपाळाच्या मूर्तीची पूजाच झालेली नाही. न त्याच्या कपाळी नाम आहे न त्याच्या गळ्यात मोगरीच्या कळ्यांचा हार. कपूर आणि फुलांचा मंद सुवास तर सोडाच, ह्या गाभाऱ्यात उग्र वास येतो तो वटवाघळांचा. अखंड मंद तेवणारी समईची सोनेरी ज्योत इथे नाही. इथे आहे तो एका तारेवर लोंबकळणाऱ्या नागड्या बल्बचा पांढरा फटफटीत, कुरूप, भगभगीत उजेड. इथल्या गाभाऱ्यापुढे भक्तीने ओथंबलेले भाविक उभे राहत नाहीत. इथल्या गाभाऱ्यापुढे तुरुंगात असतं तसं गजांचं कुलूपबंद दार आहे आणि त्यापुढे उभे असतात ते बहुधा कंटाळलेला चेहरा केलेले टुरिस्ट! 

देवळांचंही प्राक्तन असतं! 

- शेफाली वैद्य

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SUICCW
Similar Posts
कर्नाटकातलं अप्रतिम लक्ष्मी-नरसिंह मंदिर कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यात होसाहोलालू येथे वसलेलं लक्ष्मी-नरसिंह मंदिर म्हणजे होयसळ शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराची माहिती देत आहेत शेफाली वैद्य...
Trikuta Temple, Somnathpura One of my best loved travel pics! Of the trikuta hoysala temple of somnathpura, near Mysuru. This is a small, but stunning example of hoysala architecture from 13th century.
६२ वर्षे अरैयार सेवेचे व्रत सांभाळणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व : श्री. राम शर्मा माझ्या मेळुकोटे भेटीमध्ये मला अशाच एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घेण्याचा सुयोग आला. विद्वान श्री राम शर्मा, मेळुकोटेचे प्रसिद्ध अरैयार स्वामी, सध्या वय ८२; पण एखाद्या विशीतल्या तरुणाला लाजवील एवढा स्वतःच्या कामातला उत्साह. मी त्यांना भेटायला गेले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. एका छोट्या टेबलापाशी बसून श्री राम शर्मा वाचनात मग्न होते
Sculptures of Nandi in Hoysala Temples All Hoysala temples dedicated to Lord Shiva have a Murti of Nandi, either established in a separate Nandi Mandapa outside the main temple of inside the Navrang Mandapa outside the garbhagriha, his gaze fixed steadfast on his master.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language